जालना - अहमदनगर दुर्घटना प्रकरणी रोहित पवारांनी केलेल्या टिकेला रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सरकारने या घटनेची चौकशी करून निष्कर्ष निघाल्यानंतरच अशा प्रकारचे वक्तव्य करायला हवे. रोहित पवार यांचा आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसीयूमध्ये आग लागून शनिवारी 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आगीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये राजकारण सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. हॉस्पिटलमध्ये देण्यात आलेले व्हेंटिलेटर हे पीएम केअरमधून मिळाल्याचं सांगत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काल भाजपवर निशाणा साधला. रोहित पवार यांच्या या टीकेला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिलंय. ते जालन्यात बोलत होते. दुर्घटनेच्या ठिकाणी संयमाने स्टेटमेंट करायला हवं. अशा पद्धतीने ही राजकारण करायची पध्दत नाही. रोहित पवार यांनी केलेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरीत असून सरकार त्यांचं आहे. आग प्रकरणाची चौकशी करून निष्कर्ष निघाल्यानंतरच अशा पद्धतीने वक्तव्य करावं, असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय.
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे सहानुभूतीने विचार करावा -दानवे
आज एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी संपाचं हत्यार उपसलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांची मागणी रास्त असून राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे सहानुभूतीने पाहून त्यांच्या मागणीवर विचार करावा, असं आवाहन देखील रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.