जालना - नदी स्वच्छ करताना टेम्पो भरून कचरा नदी पात्रात टाकण्यासाठी एक चालक आला. त्याला विरोध केल्यामुळे टेम्पो चालकाने व त्याच्या साथीदाराने स्वच्छता निरीक्षकासह इतरांना मारहाण केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीपात्राची स्वच्छता मोहीम समस्त महाजन ट्रस्ट या संस्थेने हाती घेतली आहे . या मोहिमेला नगरपालिकेने दिनांक 12 फेब्रुवारीला 'ना हरकत प्रमाणपत्र' देऊन परवानगी दिली आहे. एकीकडे स्वच्छता मोहीम सुरू असताना दुसरीकडे टेम्पोमध्ये कचरा भरून तो नदीपात्रात आणून टाकला जात आहे.
सोमवार(दि. 2 मार्च) रोजी टेम्पोमधून (क्र. एम एच 04 एचवाय 2512) भरून आणलेला कचरा दुपारच्या सुमारास नदीपात्रात टाकत जात होता. तो टाकण्यास जालना नगर पालिकेचे स्वच्छता निरीक्षक पंडीत सखाराम पोवार आणि समस्त महाजन कर्मचारी अरर्विन नाईकनवरे, बापुराव मोरे यांच्यासह देवानंद अशोकराव चित्राल यांनी विरोध केला.
मात्र, त्यांना टेम्पो चालकासह त्याच्या साथीदारांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली .या प्रकरणी स्वच्छता निरीक्षक पंडित पोवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कलम 353, 504, 508 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हा टेम्पो पोलिसांनी जप्त करून जालन्यातील कदीम पोलीस ठाण्यात लावला आहे.
हेही वाचा - स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती परिवाराच्या वतीने शेतकऱ्यांचा सन्मान