जालना - केंद्र सरकारने राज्य सरकारला कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी दिलेला निधी कुठे आणि कसा खर्च केला, याची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जालना भाजपाने केली आहे. यासंदर्भातील एक निवेदन भाजपाने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना दिले आहे.
कोरोनाची आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे. दिवसेंदिवस राज्यातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. संपूर्ण देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. याशिवाय महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या सर्व परिस्थितीला राज्य सरकारचे नेतृत्वच जबाबदार आहे. राज्याच्या नेतृत्वाने केलेल्या दुर्लक्षामुळे आज ही परिस्थिती ओढवली आहे, असा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे.
जिल्हाधिकार्यांना निवेदन देताना भास्कर दानवे, राजेश राऊत, सिद्धिविनायक मुळे, अशोक पांगारकर, कैलास उबाळे आदी जण उपस्थित होते. त्याचवेळी, जालना जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना आज निवेदन देण्यात आले आहे.
हेही वाचा - आता सामान्य रुग्णालयातही चौकशी कक्ष; सीईओकडून पाहणी