जालना - भोकरदन पोलिसांनी राजूर भोकरदन रस्त्यावरील तीन हॉटेल्सवर धाड टाकून २८० अवैध दारूच्या बाटली जप्त केल्या आहेत. या सर्व बाटल्यांची किंमत २८ हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी तीन जाणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजूर-भोकरदन रस्त्यावरील तीन हॉटेल्समध्ये अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी आज दुपारी तीन ते साडेपाचच्या सुमारास महाराजा हॉटेलवर धाड टाकली. यात संतोष शंकर संभारे (रा. सावखेड भोई ता. देऊळगांव राजा जि. बुलडाणा) याच्याकडे ५ हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या ५० बाटली आढळल्यात, त्यानंतर दुसऱ्या हॉटेलात कृष्णा त्रिंबकराव पडुळ (वय ४५ वर्ष रा. बाणेगाव ता. भोकरदन) याच्याकडे १५ हजार ७०० रुपये किमतीच्या दारूच्या १५७ बाटल्या आढळल्यात, तर तिसऱ्या हॉटेलात एकनाथ कौतिकराव शिंदे (रा. लिंगेवाडी ता. भोकरदन) याच्याकडे ७ हजार ३०० रुपये किमतीच्या दारूच्या ७३ बाटल्या आढळल्यात. वरिल तिन्ही संशयितांविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष घोडके, सहाय्यक फौजदार शिवाजी देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल दुर्गेश राठोड, पो.कॉ संतोष वाढेकर, होमगार्ड सदा ढाकणे आदींनी केली.