जालना - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने मतदार नोंदणी दिनानिमित्त आज (शनिवारी) सकाळी शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंजली कानडे यांच्या हस्ते सकाळी गांधीचमन येथे विद्यार्थ्यांच्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच पोलीस देखील सहभागी झाले होते.
राज्य राखीव पोलीस बलाच्या बँड पथकाने वाजत गाजत ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. याठिकाणी तिथे अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांच्या उपस्थितीमध्ये उपस्थितांना शपथ देण्यात आली. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि अन्य स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे, अशा विद्यार्थ्यांचा आणि निवडणूक विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा ही यावेळी स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हेही वाचा - पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना मारहाण, नसिरुद्दीन शाहांच्या मुलीवर गुन्हा दाखल
या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, पुरवठा अधिकारी रीना बसाये, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, नायब तहसीलदार दिलीप सोनवणे, यांच्यासह निवडणूक विभागातील कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.