जालना: बाळासाहेब हे पक्षाचे वरिष्ठ नेते आणि संयमी नेते असल्याचेही चव्हाण म्हणाले. विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. आता या गोंधळावरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. त्यामुळेच, हा राजीनामा दिल्याचे बोलले जात होते. आता याप्रकरणी काँग्रेस हायकमांड कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी अशोक चव्हाण यांनी आपण पुढाकार घेऊन पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे म्हटले आहे.
बाळासाहेब हे संयमी नेते : बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबद्दल आताच कळाले असून थोरात यांचा राजीनामा ही दुर्दैवी बाब आहे. बाळासाहेब हे पक्षाचे वरिष्ठ आणि संयमी नेते आहेत. विशेष म्हणजे, आज थोरात यांचा वाढदिवस असून सकाळीच मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. थोरात यांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेईन. कॉंग्रेस पक्ष वाढीसाठी जे करावे लागेल ते सर्वकाही करणार असल्याचेही अशोक चव्हाण यांनी सांगितले. थोरात यांनी पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी ठामपणे व्यक्त केला.
कसबा, पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसच विजयी होणार : बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा स्वीकारायचा की नाही, याचा निर्णय वरिष्ठ घेतील, असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. वडेट्टीवार यांनी जालन्यात ही माहिती दिली. सत्यजित बाबतचा संभ्रम लवकर दूर व्हावा, ही माझीही इच्छा आहे, असेही ते म्हणाले. काँग्रेसकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे झाल्या चुका माफ करून आणि एकमेकांचा हातात हात घेऊन काँग्रेस पुन्हा उभी करू असे सांगत महाविकास आघाडीला सध्या चांगले यश मिळतेय. लोकांच्या डोक्यात परिवर्तनाची लाट आहे. अशा परिस्थितीत आपसात बसून वाद मिटवा. हा आमचा सल्ला राहील, असे वडेट्टीवार म्हणाले. कसब्यात, पिंपरी -चिंचवडमध्ये काँग्रेस उमेदवार निवडून येणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. आज आमदार कैलास गोरंट्यल यांच्या मुलाच्या लग्नाच्या प्रसंगी अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार जालन्यात दाखल झाले होते.
हेही वाचा : Rakhi Sawant Husband Arrested : राखी सावंतचे पतीवर गंभीर आरोप; पोलिसांनी आदिल खान दुर्राणीला केली अटक