जालना - गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनाशी दोन हात करत असलेल्या आणि खऱ्या कोरोना योद्धा म्हणून ग्रामीण भागात काम करणाऱ्या आशा स्वयंसेवकांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला आनंदोत्सव साजरा करण्यास मिळाला. गेल्या नऊ महिन्यांपासून कामात गुंतून घेतलेल्या "आशांच्या" चेहर्यावर पुन्हा एकदा नवीन वर्षानिमित्त सुख, समृद्धीचे आणि आनंदाची "आशा" पल्लवित झाली.
नऊ महिने मान अपमान
मार्चमध्ये covid-19ला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात काम करणाऱ्या आरोग्यसेविका म्हणून आशा स्वयंसेविकांवर ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची जबाबदारी येऊन पडली. त्यामुळे त्यांना वेळप्रसंगी आपल्या परिवारापासूनही दूर राहावे लागले आणि वारंवार तेच काम करत असल्यामुळे ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका दिसल्यानंतर लोकांनी नाक मुरडले आणि दारेही लावून घेतली. मात्र त्यांनी खंबीरपणे ते सगळे सहन करत जनतेच्या आरोग्यासाठी लढा दिला. त्यामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून त्यांना कोणताही आनंदोत्सव साजरा करता आला नाही.
मनसोक्त लुटला आनंद
जालना जिल्हा परिषदेच्यावतीने प्रत्येक तालुकास्तरावर राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत आशा स्वयंसेविकांसाठी विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. जालन्यामध्ये जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते उद्घाटन करून हा कार्यक्रम शुक्रवारी सुरू झाला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांचीही उपस्थिती होती. तर अॅड. विना साबू यांनी कायद्याविषयी मार्गदर्शन केले. दरम्यान, या कार्यक्रमांमध्ये रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, वेशभूषा, विविध खाद्यपदार्थ एवढेच नव्हे तर समूह नृत्य अशा विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रमही घेण्यात आला. त्यामुळे प्रत्येक सेविकेला आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळाली आणि या संधीचे सोने त्यांनी केले. कार्यक्रम झाल्यानंतर गेल्या नऊ महिन्यांपासून त्याचे तणावाखाली असलेले चेहरे आनंदाने पुन्हा प्रफुल्लित झालेले दिसत होते.
...यांनी सांभाळली या कार्यक्रमाची धुरा
जालना तालुक्याच्या तालुका आरोग्य अधिकारी शीतल सोनी यांच्यासह रावसाहेब शेळके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, अश्विनी पुणेवाड, जिल्हा समूह संघटक मनिषा कांबळे, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित होते.