जालना - राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री तथा जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांना सातव्यांदा शिवसेनेच्या वतीने एबी फॉर्म देण्यात आला. सलग ७ वेळेस हा फार्म मिळणारे अर्जुन खोतकर हे मराठवाड्यातील एकमेव उमेदवार असण्याची शक्यता आहे.
राजकीय पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी संबंधित पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याचे पत्र उमेदवारी दाखल करताना द्यावे लागते. हे प्रमाणपत्र शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल (रविवार) अर्जुन खोतकर यांना मुंबई येथे दिले. हा फॉर्म घेऊन खोतकर जालन्यात आल्यानंतर प्रथमच ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
मला सातव्यांदा उमेदवारीसाठी प्रमाणपत्र मिळत आहे. ही खूप आनंदाची बाब आहे. 1989 ची निवडणूक लढवताना जो उत्साह माझ्यात आणि माझ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे तो आजही कायम आहे. याचे कारण म्हणजे शिवसेनेने सामान्य माणसांच्या सोडवलेल्या समस्या त्यांचा संपादन केलेला विश्वास. यासोबतच मी वारकरी संप्रदायातून आल्यामुळे निश्चितच जनतेचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण अतिशय चांगला आहे. त्यामुळेच आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षाकडून उभे राहण्याची संधी मला मिळाली असल्याचे खोतकर म्हणाले.