जालना - मध्यंतरीच्या काळात खासदार रावसाहेब दानवे आणि माझ्यामध्ये सुरू असलेल्या भांडणाचा गैरफायदा घेण्यासाठी दोन वाघांच्या भांडणात 'मांजरी' वळवळ करू लागल्या. मात्र, त्यांची शेपटी कुठे दाबायची हे, आम्हाला माहीत होते. भांडण कुठे थांबवायचे ते माहीत होते, त्यामुळे विरोधकांचा हेतू साध्य झाला नाही, असा टोला अर्जुन खोतकरांनी लावला. भाजपा-सेना युतीचे उमेदवार खासदार रावसाहेब दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते मतदारांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मध्यंतरीच्या भांडणामध्ये आम्ही दोघेही शांतपणे झोपू शकलो नाही. मात्र, याचा फायदा घेण्यासाठी विरोधकांनी खूप प्रयत्न केले, ते सफल झाले नाहीत. परंतु, आता खासदार दानवे यांनी निश्चिंत रहावे आणि विजयाची जबाबदारी आमच्यावर सोपवावी.
केंद्रामध्ये नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर हे आपले मंत्री आहेतच परंतु, 'आपला बारा भोकाचा हक्काचा हा पान्हा केंद्रात पाठवून, चौदा भोकाचा आणखी मजबूत करायचा आहे' असे खोतकर म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मतदारांमध्ये एकच हशा पिकला. दानवे विजयी होण्यासाठी सर्वजण झटत आहेत, आपला विजय निश्चितच आहे, असेही ते म्हणाले.