जालना - जालना विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी त्यांच्या परिवारासोबत पत्नी संगीता गोरंट्याल आणि चिरंजीव अक्षय गोरंट्याल यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. तसेच शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनीही आपल्या परिवारासह मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. आपल्या नेत्यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावल्याने मतदारही मोठ्या उत्साहात मतदानासाठी घराबाहेर पडत आहेत.
हेही वाचा- भाजपचा 'हा' आमदार म्हणतो... 'ईव्हीएममध्ये कोणतेही बटण दाबले तरी मतदान भाजपालाच'
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.
या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.