जालना - मराठवाड्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आज शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. गेल्या आठ दिवसांपासून खोतकर दिल्लीत तळ ठोकून होते. त्यानंतर ते काल जालन्यात दाखल झाले आहेत. आज त्यांनी आपली भूमिका मांडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन केलं आहे. या घोषणेवेळी खोतकर यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. ईडीच्या कारवाईमुळे माझ्यावर संकट आले आहे. त्यामुळं मी दडपनाखाली असून हा निर्णय घेत असल्याचे खोतकर यांनील यावेळी सांगितले आहे. हा निर्णय घेण्याआधी ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बोलले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. आणि कारवाई टाळायची असेल तर तुम्ही तुमचा योग्य तो निर्णय घ्या, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले असल्याचे खोतकरांनी यावेळी सांगितले आहे.
'दबाव असताना मी कोणता निर्णय घेईन' - अर्जुन खोतकर मागील आठ दिवसांपासून दिल्लीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि अन्य खासदारांच्या सतत ते संपर्कात आहेत. शिवसेनेच्या इतर नेत्यांप्रमाणे खोतकरांवरही ईडी किंवा इतर तपास यंत्रणांचा दबाव असल्याचं बोललं जात आहे. खुद्ध खोतकरांनी सुद्ध माझ्यावर आणि कुटुंबावर दबाव असल्याचं माध्यमांसमोर सांगितलं आहे. असा दबाव असताना मी कोणता निर्णय घेईन, हे तुम्हीच सांगा.. असे खोतकर म्हणाले. मात्र, अद्याप त्यांनी ठोस निर्णय जाहीर केलेला नाही. पण, त्यांच बंड लक्षात घेता शिवसेना सक्रिय झाली आहे. जालन्याचे संपर्कप्रमुख आणि उपनेते विनोद घोसाळकर हे जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. तसेच, त्यांच्या दौऱ्याच्या पत्रिकेतून अर्जुन खोतकरांचं नावही गायब करण्यात आलं आहे.
कसा असेल दौरा - शिवसेना उपनेते व संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर शनिवारी ( 30 जुलै ) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. भोकरदन, जालना, बदणापुर आणि परतुर येथे भेट देतील. त्यांच्यासोबत सहसंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी असतील. मात्र, त्यांच्या दौऱ्याच्या पत्रिकेत अर्जुन खोतकरांचा नामोल्लेख टाळण्यात आला आहे.
हेही वाचा - Big Decision On Dahihandi : दहीहंडीच्या पार्श्वभुमीवर शिंदे सरकारचा मोठा निर्णय