जालना - संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच असून मागील आठवड्यातील मुसळधार पावसानंतर आता पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या भागातील फळबागा व पेरलेले बियाणे वाहून गेलेय, तर नुकतेच लोकसहभागातून बांधलेले बंधारे व कट्टे फुटले आहेत.
काही शेतकऱ्यांच्या विहिरी या पाण्यामुळे बुजून गेल्या आहेत, तर बाजारवाहेगाव शिवारातील शेतीची अवजारे वाहून गेल्याचे समोर आले आहे. सुखना, लहुकी, दुधना नदींना बारा वर्षानंतर पहिल्यांदा पूर आल्यामुळे नदीकाठच्या गावामध्ये पाणी शिरण्याच्या घटनात वाढ झालीय. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. बदनापूर-पाचोड रस्तावर नानेगाव येथील पूल वाहून गेल्याने हा रस्ता बंद झाला आहे. दरम्यान, आमदार नारायण कुचे यांनी सकाळीच रोषणगाव सर्कलमध्ये भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी आणि तहसीलदार होते. पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे आश्वासन देण्यात आले आहे.
बदनापूर तालुक्यात मागील पाच ते सहा वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती होती. मात्र, यंदा तालुक्यात पावसाने जोर धरलाय. गुरुवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे बदनापूर व अंबड तालुक्यातील सिमारेषेवर असलेले व बदनापूर शहराच्या दक्षिणेकडील रोषणगाव, मांजरगाव, धोपटेश्वर, कुसळी, बाजारवाहेगाव, चिकनगाव, नानेगाव, माहेरभायगाव, देशगवव्हान, बदापूर, सायगाव, अवा, अंतरवाला या गावात मागील आठवड्यातच अतिवृष्टी होऊन मोठया प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. पेरणी केलेले सर्व खरीपाचे बियाणे वाहून गेलेले असतानाच गुरुवारच्या (दि. 24 व 25) रात्री 12 वाजेपासून ते पहाटे 5 पर्यंत वरील गावासह अकोला, निकळक, कंडारी, वाल्हा, रामखेडा आदी गावातही अतिवृष्टी झाली. या भागातील शेतीत प्रचंड पाणी तुंबल्यामुळे शेती खरडून निघाली.
बैल गेले वाहून, घर उघड्यावर
रामखेडा शिवारातील गट क्रमांक 66 मधील अशोक घुगे यांच्या शेतात प्रचंड पाणी तुंबल्याने नुकतीच लावलेली सरकी लागवण वाया गेल्याचे चित्र आहे. बाजार वाहेगाव येथील राजेंद्र काळे यांचे बैल वाहून गेले आहेत. काही बैल गाळात अडकल्याचे सकाळी दिसून आले. येथील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून फळबागा वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. बाजारवाहेगाव येथील बाबासाहेब शेषराव ढवळे हे शेतवस्तीत वास्तव्यास असलेल्या शेतकऱ्यांचे राहते घर, बैलगाडी, बकऱ्या-कोंबडया वाहून गेल्या. नगदी 25 हजार रुपयांसह घरगुती साहित्य वाहून गेले.
मोसंबी झाडे उन्मळून पडली आहेत. मोसंबीच्या झाडांसाठी लावलेले ठिबक देखील वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात वाढ झाली आहे. नानेगाव येथील लहुकी नदीला मोठा पूर आला. पाचोड बदनापूर रस्त्याचे काम निर्माणाधीन आहे. यावेळी बांधण्यात आलेला तात्पुरता रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.
या सर्व गावातील व परिसरात प्रशासनाने ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. तालुक्यातील अर्धाअधिक भागात या प्रचंड पावसाने कहर केलेला असून सुकना, लहुकी, दुधना नद्या 12 वर्षांनंतर पहिल्यांदा दुधडी भरून वाहिली. नदी काठच्या गावात पाणी घुसल्यामुळे काही वेळ खळबळ उडाली होती. मात्र, सकाळी पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे.