बदनापूर (जालना) - लॉडाऊनमुळे केवळ अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व उद्योग धंदे, व्यापार बंद आहेत. शेतमजुरांच्या उपलब्धतेची समस्या असतानाही त्यावर मात करीत तालुक्यातील शेतकरी शेतातील कामांमध्ये सध्या व्यस्त आहेत. एकीकडे बहुतांशी जनजीवन ठप्प आहे मात्र, शेती व शेतीतील कामे सुरुच असून मान्सूनपूर्व नांगरणी, वखरणी बरोबरच रब्बीच्या पिकांची काढणी सुरू आहे.
हेही वाचा- मुंबईत कोरोनाचे आज 417 नवे रुग्ण; 20 जणांचा मृत्यू तर एकूण रुग्ण संख्या 6874 वर
उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळे बैलांच्या सहाय्याने पहाटे लवकर उठून बळीराजा मशागतीच्या कामाला जात आहेत. सर्व उद्योग धंदे बंद असताना शेतकऱ्यांचा शेती हा शाश्वत उद्योग मात्र सोशल डिस्टन्स पाळत सुरू असल्याचेच तालुक्यात चित्र आहे.
लॉकडाऊनने शेतीतील समस्या वाढलेला आहेत. तरीही शेतीतील कामे मात्र सुरू असून खरीपाच तयारीसाठी नांगरणी, वखरणी सुरू आहे. उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळे बैलाच्या सहाय्याने वखरणी करण्यासाठी शेतकरी पहाटे लवकर उठून सकाळी लवकर वखरणीच्या कामाला सुरूवात करत आहेत. यावेळी वखरणीमध्ये उडणारे पक्षीही शेतीत उतरुन बळीराजाचा शिण घालवत असल्याचे सुखद दृश्य पहाटे वखरणीच्या वेळेस दिसून येते.
मान्सूनपूर्व खरीपासाठी शेतीतील कामांनी वेग घेतलेला असताना रब्बीचे विशेषतः गव्हाची कापणी, मळणी अशी कामे कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने करण्यात येत आहेत. दरम्यान फळबाग जगवणाऱ्या शेतकरऱ्यांचा मात्र मोठा तोटा लॉकडाऊन काळात होत असल्याचे चित्र आहे. द्राक्षे, मोसंबी, टरबूज, खरबूज आदी फळांना उठाव नसल्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे.