जालना - भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. या धोकादायक विषाणूचा वाढता प्रकोप पाहता केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यातील एक म्हणजे जमावबंदी. परंतू, सरकारच्या या निर्णयाचं सर्वत्र उल्लंघन होताना दिसत आहे. रविवारच्या जनता कर्फ्यूला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, आज मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडले आहेत. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा - जालन्यात शुकशुकाट, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद
रविवारी जनता कर्फ्यूमुळे बंद असलेले जालना शहर आज सकाळी जीवनावश्यक वस्तूंसाठी खुले झाले. त्यामुळे लोकांनी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. पोलिसांनी जनतेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोक ऐकण्याच्या परिस्थितीत नसल्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. यावेळी पोलिसांनी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तरुणांकडून पावत्या फाडल्या. तसेच शहरात रिक्षा चालू असल्यामुळेही रिक्षाचालकांवर पोलिसांनी कारवाई केली.
दरम्यान, आजची ही परिस्थिती लक्षात घेता, दिवसभरामध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. आजच्या परिस्थितीवरून उद्या काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी दिली आहे.
हेही वाचा - #COVID -१९ : परदेशातील 60 पैकी 12 नागरिक परतले, तपासणीसाठी शोध सुरू