जालना - जिल्ह्यातील सात मध्यम आणि 57 लघु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा मुबलक प्रमाणात असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची वर्षभराची चिंता मिटली आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प जवळपास शंभर टक्के भरल्याने नागरिकांनी हे जलसाठे पाहण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्प आहेत. त्यामध्ये गिरजा कल्याण प्रकल्प जालना तालुका 92 टक्के, कल्याण मध्यम प्रकल्प जालना तालुका 37 टक्के, अप्पर दुधना प्रकल्प बदनापूर 100 टक्के, जुई मध्यम प्रकल्प भोकरदन 100 टक्के, धामणा मध्यम प्रकल्प भोकरदन 100 टक्के, जीवरेखा मध्यम प्रकल्प जाफराबाद 100 टक्के तर, अंबड तालुक्यातील गलाटी मध्यम प्रकल्पात 94 टक्के पाणी साठा आहे. या एकूण सात प्रकल्पांमध्ये एकूण 59 दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे पुढील वर्षभरासाठी पाण्याची चिंता मिटली आहे.
हेही वाचा - घाणेवाडी जलाशय पूर्णपणे भरल्यामुळे जालनाकर दीड वर्षासाठी चिंतामुक्त
मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये जालना 8, बदनापूर 3, भोकरदन 7, जाफराबाद 5, अंबड 11, घनसावंगी 8, मंठा 9, परतूर 6 असे एकूण 57 प्रकल्प आहेत. हे प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरत आले आहेत. तर, जिल्ह्यात एकूण 15 कोल्हापुरी बंधारे आहेत. या बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलेले आहे. जिल्ह्यातील या सर्वच प्रकल्पांची पाणी साठवण्याची क्षमता पूर्ण होत असल्यामुळे पुढील वर्षभर तरी जालनेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे असलेल्या अप्पर दुधना प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे आणि सोमठाणा डोंगरावर वसलेल्या रेणुका देवीच्या पायथ्याशी हा प्रकल्प आहे. या परिसरात पर्यटकांसह भाविकांचीही गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. धरणातून सांडव्यावरून वाहणारे पाणी खाली पडत असताना दिसणारा देखावा डोळ्यांचे पारणे फेडणारा असल्यामुळे नागरिक येथे ते आवर्जून हजेरी लावत आहेत.
हेही वाचा - मालवाहतूक करणारी बस सुखना नदीच्या प्रवाहात अडकली, जीवितहानी नाही