जालना(अंबड) - अंबड शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रथम वर्षे मॅकेनिकल शाखेतील एका अठरा वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोलते टाकळी(ता.फुलंब्री जि.संभाजीनगर )येथील कल्याण बापुराव कोलते, वय 18 वर्षे हा अंबड शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रथम वर्षे मॅकेनिल शाखेत शिक्षण घेत होता. तो नेहमीप्रमाणे बुधवारी(ता.20) महाविद्यालयात गेला होता. मात्र कॉलेज सुटेपर्यंत न थांबता दुपारी साडेबारा वाजताच शहरातील ओमशांती कॉलनीमध्ये राहात असलेल्या घरी गेला. जेवणाचा डबा न खाता तसाच ठेवलेला होता. त्याचा रुमपार्टनर निलेश राठोड हा महाविद्यालयातून साडेपाच वाजता रूमवर आला. रूमचा दरवाजा आतुन लावलेला होता. त्याने अनेकदा त्याला कॉल केला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने राठोड याने खिडकीतून आत डोकावून पाहिल्यानंतर त्याला कल्याण गळफास घेऊन लटकलेल्या दिसला.
याबाबत घरमालक तसेच मित्रांसोबत पोलीस ठाण्यात जावून माहिती दिली. कल्याण कोलते ज्या रूममध्ये राहत होता त्या खोलीतील भिंतीला कपडे लटवणाऱ्या खिळ्याला दोरी बांधून गळफास घेतल्याचे पोलीस यांचे निदर्शनास आले. त्याची जीभ पूर्णपणे काळी पडुन गालाला मुंग्या लगडलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. रात्री उशिरा कल्याणचे वडील बापुराव कोलते व त्याचे मामा व इतर नातेवाईक अंबड शहरातील ओमशांती कॉलनीत आले.
घटनास्थळी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पतंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ ढाकणे,पोलीस उपनिरीक्षक मधुकर पाटील,पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णु चव्हाण,रामेश्वर मुळक सह कर्मचारी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत पोलीस पंचनामा व श्ववविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू होती. कल्याण याला फस्ट सेमिनारमध्ये ऑनलाईनला चांगले गुण मिळाले होते. मात्र कल्याण कोलते याने गळफास घेऊन आत्महत्या केली की, घातपात झाला हे कळायला तयार नाही. पोलीस तपासात व शवविच्छेदन केल्यानंतरच खरे कारण समजू शकेल.