जालना - पनवेल येथील सोनू कार्गो मूव्हर्स लिमिटेड कंपनीचा ट्रक (क्रमांक - एम एच 46 एच 16 25) चोरणाऱ्या आणि त्यावर बनावट नंबर टाकून वापरणाऱ्या व्यक्तीला जालना स्थानिक गुन्हे शाखेने ट्रकसह ताब्यात घेतले आहे. जगन्नाथ रामदुलार चौधरी (39) असे या व्यक्तीचे नाव असून तो इलाहाबाद जिल्ह्यामधील कर्षणा तालुक्यातील पणासा येथील रहिवासी आहे.
राजूर रोडवर एक व्यक्ती पेंटरच्या सहाय्याने ट्रकचा नंबर बदलत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यानंतर गुन्हे शाखेचे पथक तेथे पोहोचले. तेथे एक पेंटर ट्रेकवरील मूळ नंबर मिटवून बनावट नंबर टाकत असल्याचे पोलिसांना दिसले. यावर पोलिसांनी ट्रकच्या कागदपत्रांची विचारणा केली. मात्र, चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यामुळे हा ट्रक चोरीचा असल्याचा संशय अधिकच बळावला. यानंतर ट्रकच्या इंजिन नंबरवरून मुंबईतील टाटा मोटर्सच्या मुख्यालयात विचारणा केली असता, हा ट्रक पनवेल येथील सोनू कार्गो मूव्हर्स लिमिटेड यांना विक्री केला असल्याचे सांगण्यात आले.
हा ट्रक 27 जुलैला कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याची नोंद ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी आरोपी जगन्नाथ चौधरीसह ट्रक जप्त केला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर, सहकारी दुर्गेश राजपूत, कैलास कुरेवाढ, प्रशांत देशमुख आणि कृष्णा तरंगे आदींनी केली.