जालना - केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील कार्यालयाची झडती घेतल्याप्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी हे आदेश काढले.
असा आहे घटनाक्रम -
11 जूनला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जाफराबाद येथील केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी या कार्यालयाची झडती घेतली. दरम्यान ही झडती घेण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याची तक्रार केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी पोलिस अधीक्षकांकडे दिनांक 12 रोजी दोन पानाचे पत्र लिहून केली. त्यानंतर या सर्व प्रकरणाची माहिती घेऊन पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोटरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगलसिंग सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल सचिन तिडके, शाबान तडवी, यांचा समावेश आहे.
भाजप कार्यालयात आरोपी असल्याची माहिती -
दरम्यान भाजपा कार्यालयात झाडाझडती घेण्यासाठी नव्हे तर तिथे एक आरोपी बसला असल्याची माहिती कळाली होती आणि हा आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्यामुळे इतर कुटुंबाना त्याच्यापासून धोका होता. म्हणून त्याच्या मागावर असताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जावे लागले. मात्र तिथे आरोपी मिळाला नाही आणि याबाबतची माहिती वरिष्ठांना देण्यासाठी वेळ मिळाला नाही, अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.