जालना - जालना नगरपालिकेची तब्बल दहा महिन्यानंतर सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती. यापूर्वी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभा झाली होती त्यानंतर कोविड 19 या महामारीमुळे सभा झाल्याच नाहीत. आज सभेपुढील विषयपत्रिकेवरील विषयांना मंजुरी देण्यात आली. यापुर्वी नगरसेवकांनी शहरातील स्वच्छता, विस्कळीत पाणीपुरवठा, पथदिवे आणि गावातील रस्त्यांसह मोकाट कुत्रे, जनावरांच्या प्रश्नावर चर्चा केली. नेहमीच्या सवयीप्रमाणे याही चर्चेत ही चर्चा फक्त "एरंडाचे गुऱ्हाळ ठरली" ठोस निर्णय काहीच झाले नाहीत.
तीन तास चालली सभा-
नगराध्यक्ष संगीता कैलास गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दुपारी बारा वाजता या सभेला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी नितीन नार्वेकर अधीक्षक विजय फुलंब्रीकर, बंडू चव्हाण, पाणीपुरवठा अभियंता बगळे, यांची उपस्थिती होती.
33 विषयांना मंजुरी-
विषयपत्रिकेवरील 33 विषयांना अवघ्या पंधरा मिनिटात सभागृहाने मंजुरी दिली. या मधील महत्त्वाच्या विषयांमध्ये अमृत वन देखभाल दुरुस्तीसाठी विंधन विहिरी घेणे, घाणेवाडी तलावाचे बाष्पीभवन थांबविण्यासाठी संस्थेची नियुक्ती करणे, पालिकेच्या मालकीच्या महात्मा फुले मार्केट येथील जागेत सदनिका बांधणे, शहरातील विविध चौकाचे आणि रस्त्यांचे नामकरण करणे, आणि सर्व नगरसेवकांच्या आवडीचा विषय म्हणजे महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलम 93 एक अंतर्गत प्रलंबित बिलास मान्यता मिळणे. आदी 33 विषयांना मंजुरी देण्यात आली.
या नगरसेवकांनी मांडल्या समस्या-
अशोक पांगारकर, महावीर ढक्का, शहा आलम खान, श्रीकांत घुगे, लक्ष्मण ढोबळे विजय चौधरी, राजेश राऊत अमीर पाशा भास्करराव दानवे आदी नगरसेवकांचा यामध्ये समावेश होता.
हेही वाचा- बीडमध्ये बालविवाहाने अनेक मुलींच्या सुखी स्वप्नावर 'कोयता'