जालना - रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या नरिमन नगर भागात सेफ्टी टँक साफ करत असताना तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे.
नरिमन नगर भागामध्ये 1990च्या सुमारास बांधकाम केलेले तीन घरे आहेत. सूर्यकांत नारायण कडेलवार, मेघानंद मच्छिंद्र रावस आणि अशोक लक्ष्मण बागुल या तीन घरांमध्ये एकच सेफ्टी टँक असून तो साफ करण्यासाठी खाजगी कामगारांना बोलावण्यात आले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास या सेफ्टीटॅंकच्या कामाला सुरुवात केली होती. पाच कामगार काम करत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. दरम्यान या टँकमध्ये लूकस गायकवाड (रमाबाई नगर), प्रकाश घोडके (रमाबाई नगर), आणि बाबा सुलतान बेग, रहीम नगर हे तीन कामगार टँकमध्ये उतरले आणि टँकच्या वर अन्य दोन कामगार उभे होते. हे तिन्ही कामगार टँकमध्ये उतरल्यानंतर काही वेळातच आरडाओरड सुरू झाली आणि वर उभे असलेले दोघे फरार झाले. ही आरडाओरड ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्यांनी या कामगारांना वर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाला. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले या जवानांनी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास टँकमधील तिघांपैकी बाबा सुलतान बेग या पंचवीस वर्षीय तरुणाला वर काढण्यात यश मिळवले. त्यावेळी तो बेशुद्धावस्थेत होता, मात्र रुग्णालयात नेताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. उर्वरित लूकस गायकवाड आणि प्रकाश घोडके या दोघांचेही मृतदेह टॅंकमधून बाहेर काढले आहेत. घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक सोळुंके, हे घटनास्थळी दाखल झाले तसेच जालना नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर हेदेखील घटनास्थळी उपस्थित होते.
हेही वाचा - महाराष्ट्र दिनानिमित्त लसीकरणाचा मुहूर्त.. १८ ते ४४ वयोगटापर्यंतच्या व्यक्तींना मिळणार लस