जालना - अवैध मार्गाने कत्तल करण्यासाठी नेली जात असलेली गोवंशीय जनावरे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री पकडली आहेत. दोन वाहनांमधून ही 28 जनावरे नेली जात होती. पोलिसांनी वाहन चालकांवर गुन्हे नोंदवून ही जनावरे इब्राहिमपूर येथील गोशाळेत रवाना केली आहेत.
हेही वाचा - भाववाढीची 'करामत': राजधानीत सफरचंदांपेक्षा कांदे महाग!
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांना मंगळवारी रात्री गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर त्यांनी सिल्लोडकडून भोकरदनकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवाजी चौकामध्ये नाकाबंदी केली. याचवेळी वाहन क्रमांक एमएच 21 एक्स -1717 या वाहनात १५ तर, एमएच- 19- 4945 या वाहनात १३ जनावरे भरलेली असल्याचे निदर्शनास आले. या जनावरांबाबत चालकाने कोणतीही कायदेशीर कागदपत्रे दाखवली नाहीत. त्यामुळे वरील वाहने भोकरदन पोलीस ठाण्यात जमा करून जनावरांना इब्राहिमपूर येथील गोशाळेमध्ये रवाना करण्यात आले आहे. पोलिसांनी वाहन चालक राजू मुलचंद बैनाडे (रा. अन्व ता. भोकरदन) आणि शेख सलीम शेख शब्बीर (रा. कुरेशी मोहल्ला,सिल्लोड) यांच्यावर गोवंश प्रतिबंधक, छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.