जालना- गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्राची 2635 कोटी रुपयांची हानी झाली आहे. झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना मदत, रस्ते दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी शासनाने दहा हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. त्यापैकी दोन हजार 635 कोटी रुपये हे महाराष्ट्रातील रस्ते व पूल दुरुस्तीसाठी मिळाले आहेत. औरंगाबाद विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांनी मागणी केल्यानुसार 452 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी 35 कोटी रुपये हे जालना जिल्ह्यातील रस्ते व पूल दुरुस्तीसाठी देण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
वाटुर फाटा ते देवगाव आणि देवगाव फाटा ते जिंतूर या रस्त्यासाठी देखील निधी मंजूर केला असून त्याचे काम लवकर सुरू होईल. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये रिक्तपदे असल्यामुळे कामे खोळंबली आहेत. त्यामुळे पुढील महिनाभरात बहुतांशी जागा भरण्याचा आपला प्रयत्न असेल आणि त्यामध्ये रखडलेल्या पदोन्नती पूर्ण करून या जागांवर अधिकारी बसतील, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश कुमार जेथलिया, कार्याध्यक्ष राजेंद्र राख, संजय लाखे पाटील, विलास अवताडे आदींची उपस्थिती होती.