जालना - महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वाढत असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी बुधवारी संपत आहे. संचारबंदी संपताच जिल्ह्यातील गावांमध्ये पुन्हा गर्दी होण्याची शक्यता आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीला पोलीस मित्र म्हणून 238 शिक्षकांना काम करण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी पोलीस मित्र काम करणार आहेत. पोलीस मित्रामध्ये शहरातील त्रिभुवनदास विद्यालय, दानकुंवर विद्यालय, जनता हायस्कूल, डग्लस हायस्कूल, सरस्वती भुवन प्रशाला, सी. टी. एम. के .विद्यालय, श्री स्वामी विवेकानंद विद्यालय , राष्ट्रीय हिंदी विद्यालय, जे.ई.एस. कनिष्ठ महाविद्यालय पार्थ सैनिकी शाळा, श्री शिवाजी विद्यालय, या विद्यालयातील 238 शिक्षकांचा समावेश आहे.
संबधित शिक्षकांना आजपासून सदर बाजार पोलीस ठाणे, कदीम जालना पोलीस ठाणे, चंदंनझीरा पोलीस ठाणे ,या ठरवून दिलेल्या पोलीस ठाण्यामध्ये दुपारी तीन वाजल्यापासून कर्तव्यावर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुढील आदेश येईपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी राहणार आहे. तसेच यादरम्यान पोलिसांसोबत काम करत असताना नागरिकांनी मास्क लावले आहेत किंवा नाही? सोशल डिस्टन्सिंग पाळत आहेत किंवा नाही? तसेच प्रशासनामार्फत वारंवार देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करतात किंवा नाही?, या विषयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे शिक्षक काम करणार आहेत.
आदेशाचे पालन न करणारे शिक्षक 2005 च्या आपत्ती व्यवस्थापन कलम 51 , भारतीय दंड विधान 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र ठरणार असल्याचेही ही सूचित केले आहे. त्यामुळे आज दुपारनंतर शहरांमधील विविध भागांमध्ये शिक्षक पोलीस मित्र म्हणून काम करताना दिसणार आहेत.