जालना - शहरातील कुख्यात २ गुन्हेगारांना जालन्यासह ३ जिल्ह्यातून २ वर्षासाठी उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी यांनी हद्दपार केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दिपकसिंग प्रल्हादसिंग टाक (वय 24) आणि राजसिंग शामसिंग कलाणी (वय 25) असे या गुन्हेगारांची नावे आहेत. दरम्यान, या दोन्ही आरोपींना सदर बाजार पोलीसांनी आज ताब्यात घेतले असून त्यांना जिल्ह्याबाहेर सोडण्यासाठी एक पथक रवाना झाले आहे.
जालना शहराच्या गुरुगोविंदसिंग नगर येथील या दोन्ही सराईत गुन्हेगारांविरुध्द जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, खूनाचा प्रयत्न, मारामारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी त्यामुळे या २ गुन्हेगारांविरुध्द सदर बाजार पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यामार्फत वेगवेगळे हद्दपारीचे प्रस्ताव दाखल केले होते.
या दोन्ही प्रस्तावांना उपविभागीय कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी यांनी दिपकसिंग टाक यास जालना जिल्ह्यासह औरंगाबाद, बुलढाणा या ३ जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश १६ मार्च २०१९ दिले आहेत. तर राजसिंग कलाणी यास जालना जिल्ह्यासह बीड, औरंगाबाद या ३ जिल्ह्यातून २ वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश २१ मार्च २०१९ ला दिले आहेत.
या आदेशानुसार पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधिक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्यासह पोलीस उपनिरिक्षक विजय जाधव, पोलीस नाईक कैलास खार्डे, संदीप बोंर्द्रे, पोलीस कॉंन्स्टेबल मनोज काळे, पौर्णिमा सुलाने यांनी या दोन्ही आरोपींना आज वेगवेगळ्या ठिकाणावरुन अटक करुन ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आज रात्री या दोन्ही आरोपींना हद्दपार करण्यात आलेल्या तीन्ही जिल्ह्याच्या बाहेर २ वेगवेगळ्या पथकामार्फत नेऊन सोडण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.