जालना - पाऊस पडला तरी साथीचे रोग आहेत आणि नाही पडला तरीही साथीचे रोग आहेत. या दोन्हीही संकटाच्या वेळी येणाऱ्या साथीच्या रोगांना तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र शासनाचा हिवताप विभाग सज्ज झाला आहे.
किटकांपासून उत्पत्ती होणाऱ्या साथ जन्य रोगांसाठी जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्यावतीने साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. डॉ. एस. डी .गावंडे यांच्या नेतृत्वाखाली किटकजन्य आजारांशी संबंधित साथरोग निर्माण झाले तर गस्त पथक तयार आहे. हे पथक संबंधित ठिकाणी जाऊन धूर फवारणी करण्याचे काम करणार आहे. त्यासाठी या रोगाची (डेंगू, मलेरिया ,चिकन गुनिया,) काही लक्षणे आढळली तर जनतेने ९७ ६५ ९७ ७२ ७७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्याच सोबत जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीने पारध, मंठा शहर, जालना शहरातील चंदंजिरा भाग, अंबड शहर, ही गावे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली असून तिथे विशेष लक्ष दिले जात आहे. तसेच साथीच्या रोगांना नियंत्रणात आणण्यासाठी धूर फवारणी केली जाते. त्यासाठी लागणारी पायराथोन औषधी मुबलक प्रमाणात हिवताप कार्यालयात उपलब्ध आहे. साथरोग प्रतिबंध करण्यासाठी १ ते ३० जून दरम्यान २९८ शाळेमधून हिवताप प्रतिरोध महिना राबविण्यात आला. जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांना, ८ ग्रामीण रुग्णालयाला आणि ८ तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना साथ रोगाच्या नियंत्रणा संदर्भात करावयाच्या नियोजनाबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानेदेखील साथ रोगांशी मुकाबला करण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक असणाऱ्या किट जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि २१७ उपकेंद्रांना देण्यात आले आहेत. त्याच सोबत आशा स्वयंसेविका मार्फत ग्रामीण भागातील स्वच्छतेबाबत जनजागृती ही केली जात आहे. गोदाकाठच्या गावांना पुराच्या पाण्यामुळे साथरोगांचा फटका बसू शकतो, त्यामुळे या भागावर आरोग्य विभागाच्या वतीने जास्त काळजी घेतली जात आहे. हे साथरोग अतिवृष्टी किंवा ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे होऊ शकतात.
पाऊस न पडल्यामुळे ही साथ रोगांची लागण होऊ शकते. ग्रामस्थ पाणी मिळत नसल्यामुळे जे मिळेल ते पाणी साठवून ठेवतात आणि या दूषित पाण्यामुळे कावीळ सारखे साथरोग होऊ शकतात. शुद्ध पाणी न मिळाल्यामुळे टँकरद्वारे मिळणारे पाणी, विहिरीच्या तळातून उपसलेले पाणी यामधून असे रोग उद्भवू शकतात. त्यासाठी देखील हा विभाग सतर्क झाला आहे. ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याबाबत सजग रहावे आणि शुद्ध पाणी प्यावे त्याच सोबत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मेडिक्लोर नावाचे पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करणारे द्रवण संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे. जनतेने ते घेऊन जावे आणि १५ लिटर पाण्यामध्ये ५ थेंब टाकून अर्ध्या तासाने ते पाणी वापरावे असे, आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर खतगावकर यांनी केले आहे.
पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या 40 गावांची यादी
जिल्ह्यामध्ये जालना १९, बदनापूर १०, अंबड ३०, घनसावंगी २५, परतूर १६, मंठा १२, भोकरदन २३, अशी एकूण १२३ गावे संवेदनशील गावे आहेत. तसेच अंबड तालुक्यातील १३ घनसावंगी १७, परतूर ९ ,मंठा ४, भोकरदन २, आणि जाफराबाद १, अशा एकूण ४६ गावांचा पावसाळ्यात अन्य गावांशी संपर्क तुटण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.