जळगाव - भाजपच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात काढण्यात आलेल्या मोर्चात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांना भोवळ आली होती. त्या ट्रॅक्टरवर नेत्यांची भाषण सुरू असतानाच खाली कोसळल्या होत्या. त्यांना तातडीने चारचाकीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. सोमवारी सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेवेळी हा प्रकार घडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
हेही वाचा - ST Worker Strike : बेकायदेशीर संप पुकारणाऱ्या ५ हजार एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फची नोटीस
- 3 तास उशिराने निघाला मोर्चा-
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सोमवारी दुपारी भाजपच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी दुपारी 12 वाजेची वेळ देण्यात आलेली होती. परंतु, ढिसाळ नियोजनामुळे नियोजित वेळेपेक्षा तब्बल 3 तास उशिराने म्हणजेच, दुपारी 3 वाजता हा मोर्चा सुरू झाला. शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला. जिल्हा क्रीडा संकुल, बसस्थानक, स्वातंत्र्यचौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्याठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
- ट्रॅक्टरवर उभ्या होत्या रंजना पाटील-
मोर्चात सहभागी झालेली भाजपची नेतेमंडळी एका ट्रॅक्टरवर उभे राहून मोर्चात सहभागी शेतकरी व कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. याचवेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील या देखील नेत्यांसोबत ट्रॅक्टरवर उभ्या होत्या. भाजप नेते गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असताना रंजना पाटील अचानक भोवळ येऊन ट्रॅक्टरवरच खाली कोसळल्या. त्यावेळी खासदार रक्षा खडसे व इतर महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना सावरले. मात्र, अस्वस्थ वाटत असल्याने रंजना पाटील यांना तातडीने चारचाकीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे भाजप नेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. रंजना पाटील यांच्याप्रमाणेच एका भाजपा कार्यकर्त्याला देखील अशाच प्रकारे गर्दीत भोवळ आली होती.
हेही वाचा - नवाब मलिकांचे आरोप बेछूट, याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील - भाजप नेते चंद्रकांत पाटील