जळगाव : गावातील एखाद्या व्यक्तीने चांगले काम केले आणि तरुणांनी त्याचे अनुकरण केले की गावाचा कायापालट होतो, असे म्हणतात. जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात असलेल्या मंगरुळ गावाच्या बाबतीतही असंच काहीसं घडलंय. या गावातील शाळेत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या एका शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात चालता-बोलता भर पडावी, या उद्देशाने शाळेतील भिंतीवर स्वखर्चाने शैक्षणिक माहिती, आकृती, नकाशे विविध रंगात रेखाटले. या उपक्रमातून प्रेरणा घेत गावातील तरुणाई पुढे सरसावली. त्यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावात बांधलेल्या वैयक्तिक शौचालयांच्या भिंतींसह घरांच्या भिंतींवर ज्ञान व माहिती साकारून भितींना बोलते केले. मंगरुळच्या तरुणाईने निर्माण केलेला आदर्श जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
अमळनेर शहराच्या पश्चिमेला चार किलोमीटर अंतरावर असलेले तालुक्यातील मोठे गाव म्हणून मंगरुळ परिचित आहे. दोन वर्षांपूर्वी मंगरुळ येथील कै. अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयाचे कल्पक शिक्षक संजय पाटील व इतर शिक्षकांनी शाळेच्या भिंती रंगवून त्यावर गणिताची सूत्रे, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, हिंदी साहित्य तसेच विज्ञानाची माहिती रेखाटून भिंती बोलक्या केल्या होत्या. त्याच शाळेतील माजी विद्यार्थी तसेच गावातील इतर तरुणांनी एकत्र येत 'मंगरुळ विकास मंच'ची स्थापना केली. पाणी फाउंडेशनमध्येही सहभाग घेतला. या तरुणांनी गाव पाणीदार करण्याचा प्रयत्न तर केलाच. मात्र, गावातील मुले चांगले शिकले पाहिजेत, त्यांच्या ज्ञानात भर पडावी, या उद्देशाने एक अभिनव उपक्रम राबवला.
गावातील तरुणांनी शिक्षक संजय पाटील यांच्या कल्पकतेतून प्रेरणा घेत स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावात बांधलेल्या शौचालयांच्या भिंतींचा तसेच दर्शनी भागात असलेल्या इतर भिंतींचा उपयोग करत त्यांना रंगवण्याचे काम सुरू केले. भिंतींवर गणित, मराठी, सामाजिक ज्ञान, राष्ट्रीय संदेश, पाणी वाचवा, वैज्ञानिक माहिती, चांगल्या सवयी, काल मापन आणि काळानुसार लुप्त होत चाललेली माहिती साकारून संपूर्ण गावातील भिंती बोलक्या केल्या आहेत. या उपक्रमामुळे गावातून येताना-जाताना कुठेही नजर गेली तरी मुलांच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून त्याला चांगल्या गोष्टींची माहिती मिळणार आहे. गावात आलेल्या पाहुण्याला, अधिकाऱ्याला या उपक्रमाचे आकर्षण ठरणार आहे.
उपक्रमासाठी असा जमवला निधी -
पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून मंगरुळ गाव पाणीदार करण्यासाठी गावातील होतकरू तरुण एकत्र आले होते. त्यांनी स्पर्धा काळात श्रमदान केले होते. त्या कामातील देणगीतून उरलेली रक्कम आणि गावातील नोकरीला लागलेल्या अनेक तरुणांनी या उपक्रमासाठी सढळ हाताने मदत केली. तरुणांशिवाय गावातील काही व्यक्तींनी या उपक्रमाला पाठबळ देत आपल्या परीने शक्य ती आर्थिक मदत केली. गावातील भावी पिढी सुसंस्कृत झाली पाहिजे. भविष्यात तरुणांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊन त्यांनी आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलू नये, असा त्यामागचा उद्देश आहे. 'गाव करी ते राव काय करी' ही म्हण गावातील तरुणांनी खरी करून दाखवली आहे.
तरुणाईच्या उपक्रमाची होतेय चर्चा-गावातील शाळा व शिक्षक क्रियाशील असले की विद्यार्थी क्रियाशील होतात. दिव्याने दिवा लावला की दिव्यांची माळ तयार होते, याचा प्रत्यय या उपक्रमामुळे येत आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांना या उपक्रमाच्या माध्यमातून गावात फिरूनसुद्धा ज्ञान मिळणार आहे. मंगरुळच्या तरुणाईने राबवलेला उपक्रम हा खान्देशात एक आकर्षण ठरला आहे.