जळगाव - जिल्हा पोलीस दलात हवालदार पदावर कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याने वेळोवेळी केलेल्या अत्याचारामुळे पीडित तरुणी 3 महिन्यांची गर्भवती राहिली आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचार करणाऱ्या पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
कैलास तुकाराम धाडी (रा. लोणवाडी, ता. जळगाव) असे तरुणीवर अत्याचार करणाऱ्या पोलिसाचे नाव आहे. तो सध्या जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस ठाण्यात नियुक्त आहे. दोन वर्षांपूर्वी तो एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याचे लोणवाडी येथे शेत आहे. याच शेतात आई आणि मामीसोबत कापूस वेचायला येणाऱ्या गावातील एका 19 वर्षीय तरुणीवर त्याने ऑक्टोबर 2019 ते एप्रिल 2020 या काळात वेळोवेळी अत्याचार केला. त्यातून पीडित तरुणी 3 महिन्यांची गर्भवती राहिली आहे.
शेतात काम करत असताना पीडित तरुणीला विहिरीवरून पाणी आणण्याच्या बहाण्याने एका पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन कैलास धाडी तिच्यावर सतत अत्याचार करत होता. या प्रकाराची कुणाकडे वाच्यता केली तर पीडितेसह तिच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकीदेखील त्याने दिली होती. आई-वडील गरीब असल्याने पीडितेने बदनामीच्या भीतीपोटी ही बाब कोणालाही सांगितली नाही.
प्रकार असा आला समोर -
24 मे रोजी चाळीसगाव तालुक्यातील वैतागवाडी येथील तरुणाशी पीडितेचे लग्न झाले. लग्नानंतर 27 मे रोजी तिने आपल्यासोबत घडलेली घटना पती आणि सासूला सांगितली. दोघांनी पीडितेला धीर देऊन 28 मे रोजी चाळीसगावातील एका खासगी रुग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी केली. त्यात ती 3 महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर पती आणि सासुसोबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात जात तिने कैलास धाडीविरुद्ध फिर्याद दाखल केली. त्यावरून धाडीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. या प्रकरणामुळे जळगाव जिल्हा पोलीस दल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.