जळगाव - जिल्ह्यातील यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील अल्पवयीन मुलाच्या हत्येचा उलगडा अवघ्या काही तासातच झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या हत्येप्रकरणी एका 26 वर्षीय तरुणाला शनिवारी सकाळी अटक केली. दरम्यान, हा आरोपी 'सिरीयल किलर' निघाला असून त्याने यापूर्वी अशाच पद्धतीने एका बालकाचा खून केल्याचे समोर आले आहे.
यश पाटील (वय 26) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने येथील एका अल्पवयीन बालकाची 2 दिवसांपूर्वी निर्घृणपणे हत्या केली होती. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येपूर्वी यशने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचारदेखील केल्याची कबुली दिली आहे.
ही घटना समोर आल्यानंतर डांभुर्णी ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांवरून पोलिसांचा संशय यशवर बळावला होता. त्यानुसार पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून शनिवारी सकाळी त्याच्या मुसक्या आवळल्या. तो कोळन्हावी शिवारातील एका शेतात लपून बसला होता.
पोलिसांच्या पथकाने आरोपी यशला अटक केल्याची बातमी डांभुर्णी कळताच ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. ग्रामस्थांनी आरोपीला चोप देण्याचा प्रयत्न केला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात त्याला तेथून जळगावला हलवले.
भोकरच्या हत्येचाही झाला उलगडा-
आरोपी यशला अटक केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जळगावात आणले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने जळगाव तालुक्यातील भोकर येथील एका अल्पवयीन बालकाची क्रूरपणे हत्या केल्याची कबुली दिली. रोहित हा 12 मार्चरोजी अचानक बेपत्ता झाला होता. तर त्यानंतर 16 मार्च रोजी भोकर शिवारातील एका शेतात अल्पवयीन मुलाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला होता. त्याची अनैसर्गिक अत्याचार केल्यानंतर गळा दाबून हत्या झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले होते.
आरोपी बालकांवर करायचा अनैसर्गिक अत्याचार -
आरोपी यश हा वासनांध झाला होता. तो लहान बालकांवर अनैसर्गिक अत्याचार करायचा. बालकांना खाऊचे आमिष दाखवून त्यांना निर्जनस्थळी न्यायचे, त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करायचे आणि त्यानंतर हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून त्यांची निर्घृणपणे हत्या करायची, अशी आरोपी यशची गुन्हा करण्याची पद्धत होती, ती पोलीस तपासात समोर आली. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी भडगाव शहरातील एका बालकाचीदेखील अशाच प्रकारे हत्या झाल्याचे समोर आले होते. त्या बालकाची हत्या यशनेच केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास सुरू आहे.