जळगाव - शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षभरापासून सुरु आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरु असल्याने नागरिकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, हे काम मुदतीत पूर्ण करण्यासाठी बांधकाम विभागाने ‘टी’ आकाराचा पूल मंजूर केला असताना ‘टी’ आकाराला स्थगिती देवून ‘एल’ आकाराच्याच पुलाचे काम सुरु केले आहे. ‘टी’ आकारासाठी विद्युत खांबच अडथळा ठरत असून, हे खांब हटविण्याचे काम महावितरण कंपनी करेल की मनपा, यामध्येच हे काम अडकलेले आहे.
तोपर्यंत पुलाचेही काम लांबत जाईल -
शिवाजीनगरचा उड्डाणपुल मुदतीत पूर्ण होणे कठीण असल्याने ‘टी’ आकाराच्या पुलाला स्थगिती देण्यात आली असून, विद्युत खांबचा अडथळा दुर झाल्यानंतरच ‘टी’ आकाराचा विचार होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून शहरातील शिवाजीनगर उड्डाणपूलाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. मात्र, हे काम सुरु असताना पुलालगत व खालच्या बाजूला असलेले महावितरणचे विद्युत खांब हटविले गेले नसल्याने काम अतिशय संथगतीने सुरु आहे. पुढील कामाला या विद्युत खांबमुळे अडथळा येत असून, हे खांब हटविण्याचे काम जोपर्यंत लांबत जाणार आहे. तोपर्यंत पुलाचेही काम लांबत जाईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
३१ मार्चपर्यंत आहे कामाची मुदत -
पुलाचे काम पूर्ण करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंतची आहे. त्यामुळे आता महावितरणची वाट न पाहता बांधकाम विभागाने ‘एल’ आकाराच्या पुलाचे काम पूर्ण करण्याची तयारी सुरु केली आहे. पूर्वीप्रमाणेच पूल तयार झाला, तर त्यावरून वाहतूक सुरु होवू शकते. त्यानंतर विद्युत खांब काढण्यात आले, तर पुढे शिवाजीनगर भागातील अमर चौकपर्यंत मार्ग काढता येवू शकतो, असे मत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
आतापर्यंत ६० टक्के झाले आहे काम -
फेब्रुवारी २०१९ पासून शिवाजीनगर उड्डाणपूलाचे काम सुरु असून, मार्च २०२१ पर्यंत या कामाची मुदत आहे. मात्र, आतापर्यंत या पुलाचे काम ६० टक्के इतके झाले असून, पुलादरम्यान येणाऱ्या विद्युत खांबामुळे अनेकवेळा हे काम थांबले आहे. विद्युत खांब काढण्यासाठीची जबाबदारी महावितरणवर सोपविण्यात आली आहे. मात्र, खांब काढण्यासाठी महावितरणकडे निधी नसल्याने हे काम होवू शकलेले नाही. हा पूल मनपाच्या हद्दीत असल्याने या कामासाठी मनपानेदेखील निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, मनपाकडे देखील अद्याप निधीबाबत कोणतेही उत्तर आलेले नाही.
निधीचा प्रस्ताव धुळखात -
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, महावितरण व रेल्वेचे अधिकारीदेखील उपस्थित होते. कामाला लागणारा खर्च याबाबतचा अंदाजपत्रक तयार करून, राज्य शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाकडे दीड कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, हा प्रस्ताव मंत्रालयात धुळखात पडलेला आहे.
‘एल’ आकाराला स्थानिकांची अडचण नाही -
पूर्वीप्रमाणे होत असलेल्या पुलाला स्थानिकांची कोणतीही अडचण नसून, ‘टी’ आकाराला स्थानिकांचा विरोध होता. ‘एल’ आकारातील पुल तयार झाला, तर या भागातील नागरिकांना कानळदा रस्त्याकडून पुलाचा वापर करता येणार आहे. मात्र, या भागातील इतर नागरिकांच्या सोयीसाठी ब्राम्हणसभेकडून बोगदा तयार करून द्यावा, अशी मागणी स्थानिकांची आहे. याबाबत रेल्वेकडे पाठपुरावा सुरु आहे.
हेही वाचा - फिरण्यासाठी आलेल्या तरुणावर खारघरमध्ये गोळीबार; रुग्णालयात उपचार सुरू