जळगाव- शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे गेल्या 3 दिवसांपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत जळगाव महापालिकेतील काही भाजप नगरसेवक, आज आपल्या हाती शिवबंधन बांधणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश काही कारणास्तव रखडला होता. आता राऊत यांच्या उपस्थितीत ते भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याने, जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान पदाधिकारी नियुक्तीवरून शिवसेनेत नाराजीनाट्य उफाळून आले असून, जिल्ह्यातील बड्या नेत्यांसह पदाधिकारी नाराज झाले आहेत.
नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात दौरा केल्यानंतर ते आता जळगावात दाखल झाले आहेत. आज ते जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. सुरुवातीला ते जळगाव महापालिकेच्या नगरसेवकांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. यावेळी महापालिकेशी निगडित प्रश्न, निधीची उपलब्धता, गट-तट यासारख्या विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून रंगले नाराजीनाट्य -
पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी जळगाव जिल्हा शिवसेनेच्या कार्यकारणीत नुकतेच फेरबदल करण्यात आले आहेत. पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना ज्येष्ठांना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले व नवख्यांना पदे देण्यात आली, असा आरोप करत काही नेतेमंडळी नाराज झाली आहे. ही नाराजी आज संजय राऊत दूर करणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सकाळपासून जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून, याकडे जिल्ह्यातील बडे नेते, पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे.
भाजपला पुन्हा खिंडार पडणार?
या बैठकीत शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या भाजप नगरसेवकांच्या विषयावरही खल होण्याची शक्यता आहे. भाजपच्या नगरसेवकांचा संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. नगरसेवकांच्या बैठकीनंतर जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. यात नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी राकेश टिकैत महाराष्ट्र, कर्नाटक दौऱ्यावर