जळगाव - शहरातील नेहरू नगरात राहणार्या प्रशांत पाटील या पोलीस कर्मचार्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडली. भाग्यश्री पाटील (वय २६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, मृत विवाहितेच्या माहेरवासीयांनी सासरच्या मंडळींवर आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
जानेवारी २०१६ मध्ये रोजी भाग्यश्रीचा विवाह झाला होता. काही दिवसांपूर्वी प्रशांत यांचा पत्नीशी किरकोळ वाद झाला होता. बुधवारी प्रशांत यांचा वाढदिवस होता. रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास पत्नी भाग्यश्री यांनी 'मी जग सोडून जात आहे. तुम्ही आनंदी रहा' अशा शब्दात त्यांच्या मोबाईलवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दुसर्या खोलीत जाऊन भाग्यश्री यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. रात्री १.१५ वाजेच्या सुमारास प्रशांत यांचे वडील प्रकाश हे उठले असता, त्यांना दुसर्या खोलीतील लाईट सुरु दिसला. त्यानंतर त्यांनी खोलीत पाहिले असता, भाग्यश्री यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.रात्री १.३० वाजेच्या सुमारास भाग्यश्री यांना खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी तपासणीअंती वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, पतीसह सासरच्या मंडळींनी भाग्यश्री यांची गळा आवळून हत्या केली असल्याचा आरोप भाग्यश्री यांच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. भाग्यश्री यांचे इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात गोंधळ निर्माण झाला होता. भाग्यश्रीला नोकरी लावून देण्यासाठी माहेरुन २५ लाख रुपये आणावे, या कारणावरून तिच्या पतीसह सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरु होता, असा आरोप भाग्यश्री यांचे वडील अरुण पाटील आणि भाऊ नीलेश यांनी केला आहे. डीवायएसपी डॉ. निलाभ रोहन यांनी जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची समजूत घालत शवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.