जळगाव- जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की येथे सोमवारी दुपारी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. चक्रीवादळामुळे शेतीतील नुकसान जास्त प्रमाणात दाखवून जास्त नुकसान भरपाई मिळावी, यासाठी खासगी विमा कंपनीचे दोन प्रतिनिधी शेतकऱ्यांकडून पैसे उकळत होते. हा गैरप्रकार शेतकऱ्यांसह आमदार व तहसीलदारांनी स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून उघड केला आहे. दोघांना शेतकऱ्यांकडून २८ हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. विनायक रामचंद्र पाटील (वय २५) व जितेंद्र सुभाष महाजन (वय २७) अशी पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघे रावेर येथील रहिवासी आहेत. दोघांविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून विमा प्रतिनिधींचे पितळ केले उघड काय आहे नेमका प्रकार?मुक्ताईनगर तालुक्यात १५ दिवसांपूर्वी चक्रीवादळ आले होते. या वादळामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम विमा कंपनीकडून सुरू आहे. यात शेतीतील नुकसान जास्त दाखवून जास्त नुकसान भरपाई मिळावी, यासाठी विनायक व जितेंद्र हे दोघे जण शेतकऱ्यांकडून एकराप्रमाणे २ हजार रुपये घेत होते. यासंदर्भात काही शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार आमदार पाटील यांनी सोमवारी दुपारी तहसीलदार श्वेता संचेती यांच्यासह सापळा रचला. त्यात दोघे प्रवीण महाजन या शेतकऱ्याकडून २८ हजार रुपये घेताना रंगेहात पकडले गेले. दोघांना आमदार व तहसीलदार यांनी चांगलाच जाब विचारला.
विमा कंपनीने बंद केले होते सर्व्हेचे काम -दरम्यान, हा प्रकार उघड झाल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक महेंद्र खरात यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी विमा कंपनीकडून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे व सर्व्हेचे काम थांबण्यात आले आहे. तरीही दोघे शेतकऱ्यांकडून पैसे घेत होते. त्यांच्याविरुद्ध कंपनीच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल केली जाईल, अशी माहिती खरात यांनी दिली.
विमा कंपनीचाही दोष -घडलेल्या प्रकारात विमा कंपनी देखील दोषी आहे. आपले कर्मचारी काय उद्योग करत आहेत. काम व्यवस्थित होत आहे किंवा नाही, याची पडताळणी कंपनीने करायला हवी होती. आता सारा प्रकार उघड झाल्यानंतर कर्मचारी काय करत होते, याची माहिती नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. या प्रकाराबाबत मी कृषी मंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. अशी माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.
हेही वाचा- देवीच्या मंदिरातील दागिन्यांसह मूर्तींची चोरी; मुद्देमालासह अल्पवीयन त्रिकुट ताब्यात