जळगाव - भाजपाचे माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी काल भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता ते उद्या (शुक्रवारी) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. 'कमळा'ची साथ सोडून खडसे आता आपल्या हातावर 'घड्याळ' बांधणार आहेत. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यासह खान्देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. विशेष म्हणजे, खडसेंच्या पक्षांतरामुळे त्यांच्या आतापर्यंत एकसंघ असणाऱ्या कुटुंबाचे राष्ट्रवादी आणि भाजपा अशा दोन पक्षात विभाजन होणार आहे. खडसे हे मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांनी आगामी काळातील राजकीय रणनीती ठरवूनच पक्षांतरासारखा मोठा निर्णय घेतला असावा, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
एकनाथ खडसेंच्या 40 वर्षांच्या राजकीय प्रवासात त्यांनी भाजपच्या पक्षसंघटन बळकटीसह पक्षाच्या विस्तारात मोलाची भूमिका पार पाडली आहे. ज्याकाळी भाजपसाठी प्रतिकूल परिस्थिती होती, त्या कालखंडात खडसेंनी भाजपसाठी परिश्रम घेतले हे सर्वश्रुत आहे. परंतु, पक्षाला सुगीचे दिवस आल्यानंतर मात्र, खडसेंच्या बाबतीत अन्यायकारक धोरण अवलंबले गेले. गेल्या साडेचार वर्षांत तर खडसेंना पद्धतशीरपणे बाजूला सारण्यात आले. पक्षाच्या निर्णयप्रक्रियेतूनही त्यांना डावलण्यात आले. पक्षाकडून सातत्याने अन्याय होत असल्याने शिवाय पक्षश्रेष्ठी दखलच घेत नसल्याने खडसेंनी इच्छा नसताना भाजपला रामराम करून टाकला.
आता राजकीय पुनर्वसनाच्या दृष्टीने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय निवडला. वरवर पाहता हा निर्णय खडसेंनी आपल्या राजकीय पुनर्वसनासाठी घेतला असावा, असे वाटत असले तरी राजकीय विश्लेषक मात्र, त्याला दुसऱ्याच नजरेतून पाहत आहेत. खडसेंना आपल्या राजकीय वारसदाराच्या जडणघडणीसाठी हा निर्णय घ्यावा लागला असेल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. यात प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे, पुढे खडसेंचा राजकीय वारसदार कोण? तर या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी फार विचार करण्याची गरज नाही. खडसेंच्या कन्या तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर याच त्यांच्या राजकीय वारस असू शकतात. राजकीय वारसदार म्हणून रोहिणी खडसेंच्या नावाचा विचार केला तर आज खडसेंनी घेतलेला पक्षांतराचा निर्णय अगदी समर्पक आहे, असेही राजकीय विश्लेषकांना वाटते.
खडसे विधानपरिषदेवर जाऊन होणार मंत्री -
एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधानपरिषद सदस्यत्व तसेच ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे निश्चित मानले जात आहे. खडसेंना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यास ते जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरदेखील दावा करण्याची शक्यता आहे. अशावेळी सध्याचे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अन्य जिल्ह्यात पालकमंत्रीपदी पुनर्वसन केले जाऊ शकते. खडसेंच्या रुपाने लवकरच जळगाव जिल्ह्यात दुसरे मंत्रिपद मिळू शकते. खडसेंचे राजकीय पुनर्वसन झाल्यानंतर ते पुढील सहा वर्षे आमदार म्हणून कार्यरत राहतील. त्यानंतर पुढच्या साधारण चार वर्षात रोहिणी खडसेंना जळगाव शहर किंवा मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून लॉन्च केले जाऊ शकते. खडसेंच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी खडसे आता पूर्णवेळ सक्रिय होतील, असा अंदाज आहे. रोहिणी खडसेंना सहकार क्षेत्राचा चांगला अनुभव आहे. शिवाय त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे. भाजपात सक्रिय असताना त्यांच्याकडे महिला कार्यकारिणीची जबाबदारी होती. रोहिणी खडसेंच्या या साऱ्या गोष्टी खासदार रक्षा खडसेंच्या तुलनेत उजव्या मानल्या जातात. त्यामुळे रोहिणी यांच्या बाजूनेच खडसेंच्या राजकीय वारसदार असल्याची मते राजकीय विश्लेषक मांडतात.
खासदार रक्षा खडसे यांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर, रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आल्या आहेत. त्यांची खासदारकीची ही दुसरी टर्म आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला रक्षा खडसे भाजप सोडणार नाहीत. त्या आपल्या खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण करतील. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी किंवा लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर रक्षा खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करतील आणि पुढे रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या खासदारकीच्या उमेदवार असतील, असाही राजकीय विश्लेषकांचा एक अंदाज आहे.
...अन्यथा नणंद-भावजयीत संघर्ष?
खासदार रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदारसंघाचे सलग दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करत आहेत. रक्षा खडसे यांनी आता स्वतः रक्षा खडसे म्हणून स्वतःचा गोतावळा बऱ्यापैकी जमवला आहे. या पुढच्या काळात भाजपाकडून रक्षा खडसे यांना बळ मिळाले तर त्या यापुढेही भाजपात राहतील. त्यानंतर मात्र, रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यात राजकीय वर्चस्वातून संघर्ष होऊ शकतो, असाही अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.