जळगाव - आज महाराष्ट्रात कोरोनामुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, ती पाहता राजकीय भानगडीत न पडता, सर्वांनी महाराष्ट्र नव्याने उभा करण्यासाठी काम करायला हवं, असे मत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी जळगावात व्यक्त केले.
मुंबईहून नागपूरला जात असताना शुक्रवारी सायंकाळी ते जळगावात आले होते. यावेळी त्यांनी शहरातील अजिंठा विश्रामगृहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत धावती आढावा बैठक घेत जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीची माहिती जाणून घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारकीच्या विषयासंदर्भात राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेबाबत काय सांगाल, अशी विचारणा पत्रकारांनी केली असता नाना पटोले म्हणाले की, विधानसभेचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना मला भाजप असो, शिवसेना असो किंवा अन्य कोणताही पक्ष असो, सर्व मला बरोबरीचेच आहेत. विधानसभेचा अध्यक्ष या नात्याने सर्व पक्षांना सोबत घेऊन विधिमंडळाचे कामकाज सुरळीतपणे पार पडावं, त्यातून राज्याच्या जनतेला फायदा व्हावा, ही भूमिका या पदाची असते. त्यामुळे मी राजकारणापासून दूर आहे, मला राजकीय विषयावर भाष्य करता येणार नाही, असे सांगत त्यांनी अधिक बोलणं टाळले. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. 21 रोजी निवडणूक होऊन उद्धव ठाकरे आमदार होतील आणि पुन्हा सरकार सांभाळतील, अशी परिस्थिती आज तरी आहे, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल-
राज्य सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा कोरोनाच्या लढ्यात चांगले काम करत आहे. विशेष करून पोलीस, महसूल तसेच आरोग्य यंत्रणा झोकून देऊन काम करत आहे. त्यामुळे महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास देखील नाना पटोलेंनी यावेळी व्यक्त केला.