जळगाव - सुप्रीम काॅलनी भागातील पाेलीस काॅलनी परिसरातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या १२ दिवसापासून महापालिकेकडून या परिसरात पुरवठा करण्यात आलेला नाही. वास्तविक या भागातील नागरिकांकडून देखील पाणीपट्टीचे २ हजार रूपये आकारले जातात. परंतु, ३६५ दिवसात केवळ ४० दिवसच पुरवठा केला जात असल्याची ओरड सुरू आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांकडून अनेक वेळा पाहणी झाली. परंतु, पाणी प्रश्न काही सुटलेला नाही.
गेल्या २३ मे पासून आतापर्यंत पाेलीस काॅलनी परिसरात अद्यापही पाणीपुरवठा झालेला नाही. उन्हाळ्यात या परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा प्रचंड सामना करावा लागत आहे. शहरात आठवडाभरात 2 वेळा पाणीपुरवठा केला जाताे. परंतु, सुप्रीम काॅलनी परिसरात मात्र एकदाही पुरवठा हाेत नसल्याची नागरिकांची व्यथा आहे.
पालिकेने पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने सुप्रीम काॅलनीत उंच टाकी उभारलेली नसल्यामुळेच ही समस्या उद्भवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पालिकेकडून अचानक केव्हाही पाणीपुरवठा करण्याचा जणू पायंडा पडला आहे. शहरात आठवड्यातून दाेन वेळा पाणीपुरवठा केला जाताे. परंतु, सुप्रीम काॅलनी परिसरात वर्षातून केवळ ४० वेळा पाणीपुरवठा हाेत असल्याने नागरिक हैराण झाले असल्याची तक्रार परिसरातील रहिवासी शेख खलील माेजम यांनी केली आहे.
जळगाव शहराच्या टाेकावर असलेल्या सुप्रीम काॅलनीतील पाणीप्रश्न गेल्या अनेक वर्षापासून आजही कायम आहे. केवळ ४० दिवसच पुरवठा केला जात असल्याची ओरड सुरू आहे. तरी देखील पालिका प्रशासन, राजकीय पदाधिकाऱ्यांकडून या समस्येकडे दुर्लक्ष हाेत आहे.