जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाच्या २४ दरवाज्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्यास २४ तासात सुमारे ४८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणाचे २४ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. या दरवाज्यातून तापी नदीपात्रात २ हजार ३१२ क्युमेक्स म्हणजेच ८१ हजार ६५९ क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सद्यस्थितीत धरणाची जलपातळी २१०.०८० मीटर इतकी आहे.
जळगाव जिल्ह्यासह विदर्भ आणि मध्यप्रदेशात देखील जोरदार पाऊस सुरूच असल्याने बदलती परिस्थिती लक्षात घेऊन हतनूर धरणाचे अजून दरवाजे उघडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.