जळगाव - गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात थंडीचा कडाका जाणवत होता. थंडीचा कडाका अनुभवल्यानंतर आता पुन्हा जिल्ह्यात आगामी चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम राजस्थान भागात एक चक्रवाती क्षेत्र विकसित होत असून, यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना ब्रेक लागला आहे. तसेच कमी दाबाचा पट्टा देखील तयार होत असल्याने जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा चिंता वाढल्या आहेत. शुक्रवारी जिल्ह्यातील वातावरणावर देखील परिणाम झालेला पाहायला मिळाला. शुक्रवारी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी बऱ्याच अंशी ढगाळ वातावरण होते.
पुन्हा पावसाचा अंदाज-
जिल्ह्यात यंदा संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर महिन्यात थंडीचा कडाका वाढला होता. तर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात थंडीत घट येऊन चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण होते. त्यानंतर पुन्हा थंडीचा जोर वाढला. डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात तीन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. आता गेल्या पंधरा दिवसांपासून थंडीचा कडाका वाढू लागला होता. तसेच उत्तरेकडून येणारे शीत वारे देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले होते. मात्र, पुन्हा बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे राजस्थानपर्यंत जावून उत्तरेकडील थंड वाऱ्यांना धडकल्याने चक्रवाती क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तापमानात ४ अंशांची वाढ-
शुक्रवारी शहरात दिवसभर अंशत: ढगाळ वातावरण होते. यामुळे तापमानात देखील वाढ झाली आहे. गुरुवारी शहराचा किमान तापमानाचा पारा ११ अंशावर होता. तर शुक्रवारी शहराचा किमान तापमानात ४ अंशाची वाढ होवून पारा १५ अंशापर्यंत वाढला होता. कमाल तापमानात देखील २ अंशाची वाढ झाली. त्यामुळे वातावरणातील गारवा कमी झाला होता. दरम्यान, अजून चार ते पाच दिवस वातावरण स्थिर राहण्याची शक्यता असून, ३ व ४ तारखेला पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
रब्बीला फटका बसणार-
ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी हंगामाला फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे हरभरा व मक्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासह गव्हाच्या वाढीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. अवकाळीचा अंदाजामुळे शेतकऱ्यांचा चिंता वाढल्या आहेत.
हेही वाचा- 31 डिसेंबरला नार्कोटिक्स विभागाची मुंबईत छापेमारी; तिघे ताब्यात