जळगाव - लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा घोळ अखेर संपला असून भाजपने विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांची घोषितकेलेली उमेदवारी रद्द करण्यात आली.त्यांच्याजागी चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पाटील यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपकडून एबी फॉर्म तसेच उमेदवार बदलासंदर्भात पक्षाच्या प्रतिज्ञापत्रासह उमेदवारी अर्ज दाखल केला.
स्मिता वाघ यांच्या उमेदवारीनंतर भाजपत नाराजीचा सूर उमठला होता. स्मिता वाघ यांची उमेदवारी आता अधिकृतरित्या मागे घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील नारांजामध्ये प्रामुख्याने विद्यमान भाजप खासदार ए. टी. नाना पाटील, अमळनेरचे भाजपचे सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता. तसेच भाजपत देखील मोठ्या प्रमाणात अंतर्गत धुसफूस सुरू होती. यामुळे पक्षाने ऐनवेळी स्मिता वाघ यांच्या उमेदवारीचा पत्ता कापून उन्मेष पाटील यांना भाजपकडून उमेदवारी दिली आहे.
आमदार उन्मेष पाटील यांचा अर्ज दाखल करतेवेळी उमेदवारी कापल्याने नाराज असलेल्या स्मिता वाघ जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या होत्या. पक्षाने आदेश दिला तर आपण उन्मेष पाटील यांच्यासोबत काम करू असे स्मिता वाघ म्हणाल्या. शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनापासून रक्ताचे पाणी करत ज्या पक्षासाठी काम केले. त्याच पक्षाने आपली उमेदवारी कापून दुसऱ्याला उमेदवारी दिली. महिला कार्यकर्त्यांचा हा अपमान असल्याची प्रतिक्रिया देखील स्मिता वाघांनी दिलीय. तीस वर्षे आपण पक्षासाठी काम केले. मात्र चार वर्षांपासून भाजपत असलेल्या आमदाराला पक्षाने कोणत्या गुणवत्तेच्या आधारावर तिकीट दिले? त्याचबरोबर आपले तिकीट का कापले जातेय असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला.