जळगाव - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात नुकतीच भेट झाली. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच भाजप आणि मनसेत युती होणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. याच विषयासंदर्भात भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी येथे सूचक वक्तव्य केले आहे. राज ठाकरेंनी जर आपल्या भूमिकेत काही बदल केले तर निश्चितच भाजप आणि मनसे एकत्र येऊ शकतात, असे मत दानवेंनी मांडले आहे.
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची राजकीय भेट झाली. यानंतर केंद्रीय मंत्री दानवे यांनीदेखील खळबळजनक प्रतिक्रिया देत आगामी काळात काहीतरी मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे संकेत देत उत्सुकता निर्माण केली आहे. राजकीय क्षेत्रात कोणत्याही पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांची भेट घेऊ शकतो. यातून विचारांचे आदानप्रदान होते. मात्र, अशी एखादी भेट झाली की त्याचे निरनिराळ्या प्रकारचे अर्थ लावले जातात. ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील भेट ही देखील अशीच भेट असू शकते. या भेटीसंदर्भात फडणवीस यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले आहे, राज ठाकरेंची भूमिका आणि भाजपचे तत्त्व आणि भूमिका वेगळी आहे. मात्र, राज ठाकरेंनी जर आपली भूमिका बदलली तर काहीही होऊ शकते, असे दानवे यावेळी म्हणाले.
हेही वाचा - 'मी येथे आलोय.. तुमच्या समोर आहे..पाहून घ्या'
दरम्यान, दानवेंच्या प्रतिक्रियेनंतर भाजप आणि मनसेत युती होण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा बळ मिळाले आहे.