जळगाव - जिल्ह्यातील पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात शनिवारी रात्रीच्या वेळी ऑक्सिजनचा साठा संपला होता. त्यामुळे ऑक्सिजन अभावी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. प्रशासनाकडून या घटनेसंदर्भात कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. दरम्यान, ऑक्सिजनचा साठा संपल्यानंतर शहरातील काही खासगी रुग्णालयातून ऑक्सिजन उपलब्ध करण्यात आला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
पाचोरा शहरासह परिसरात कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढत असून, रुग्णसंख्येसह मृत्यू होणाऱ्यांचे वाढते प्रमाण अत्यंत भीतीदायक ठरत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातही कुटुंबच्या कुटुंब बाधित होत असल्याने सरकारी व खासगी रुग्णालये हाऊसफुल झाली आहेत. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शनिवारी रात्री (१ मे रोजी) ३० रुग्ण उपचार घेत असताना ऑक्सिजन संपल्याने प्रचंड खळबळ उडाली. त्यात महेश राठोड (वय ३२, रा. कुऱ्हाड बुद्रुक, ता. पाचोरा) व ग्यारसीबाई चव्हाण (वय ७६, रा. हनुमंतखेडा, ता. सोयगाव) या दोघांचा मृत्यू झाला. या दोघांचा मृत्यू हा ऑक्सिजन अभावी झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. या घटनेमुळे रुग्णालयातील उर्वरित रुग्ण व त्यांचे नातलग प्रचंड भयभीत झाले होते.
खासगी रुग्णालयातून ऑक्सिजनचा पुरवठा
ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपल्याने उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांचे जीव धोक्यात आल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांना कळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णांना त्वरित करता यावा म्हणून शहरातील खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांना त्यांनी विनंती केली. आनंद हॉस्पिटलचे डॉ. आनंद मौर्य, विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ. भूषण मगर व सागर गरुड, संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. पवनसिंग पाटील यांनी शिंदे यांच्या विनंतीला मान देत आपल्याकडील ऑक्सिजन सिलिंडर उसनवारीच्या बोलीवर त्यांना दिले. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील इतर रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य झाले व रुग्णांचे प्राणही वाचले.