जळगाव : कोरोनासाठी उपाययोजना म्हणून शासनाने अधिग्रहित केलेल्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्य सेवेच्या व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाने दोन शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनोद गायकवाड व वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांचा समावेश आहे. या सोबतच कोरोना संशयित रुग्णांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यासाठी महापालिका दोन रुग्णवाहिका खरेदी करणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जळगावात भेट दिली व जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी फडणवीस यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारासंदर्भात रुग्णालयांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांचे व्यवस्थापन असावे, असे सुचविले. तसेच महापालिकेकडे केवळ एकच रुग्णवाहिका असल्याने रुग्णांना ने-आण करण्यासाठी प्रश्न उद्भवतात, असाही मुद्दा मांडला होता. या संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या वतीने नुकत्याच केलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दिली.
दररोज १२०० तपासण्या :
जळगावात पाहिजे त्या प्रमाणात तपासण्या होत नाही व अहवाल लवकर येत नसल्याचे फडणवीस म्हणाले. पूर्वी अहवाल येण्याचे प्रमाण कमी होते. मात्र, आता तपासण्यांचे प्रमाण वाढले असून दररोज जवळपास १ हजार २०० तपासण्या होत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्ह्यातील तपासण्यांचे प्रमाण पाहता सध्या ५ हजार ३६७ प्रति लक्ष असून ते गेल्या आठवड्यापर्यंत ४ हजार ३६१ पर्यंत होते. त्यात आता वाढ झाली असून ते ८ हजार प्रति लक्षापर्यंत नेण्याचे उद्दीष्ट असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
५ हजार अँटीजन टेस्ट किट दाखल :
कोरोना रुग्णांचे निदान लवकर व्हावे, यासाठी अँटीजन टेस्ट किट मागविण्यात आल्या असून सध्या ५ हजार कीट दाखल झाल्या आहेत. याद्वारे तपासणीदेखील सुरू झाली असून तपासणी केलेल्या ७० जणांचे अहवाल तत्काळ आले. यामध्ये ६५ जण निगेटिव्ह आले असून पाचजण पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबई, औरंगाबाद अशा ठिकाणी नागरिकांमध्ये कोरोना तपासणीसाठी अँटीजन टेस्टचा वापर करण्यात येत असून या टेस्टद्वारे एका तासामध्ये रुग्ण बाधित किंवा अबाधित असल्याचे निदान होत आहे. त्यामुळे जळगावातही आता याची मदत होणार आहे.
सर्वेक्षणात चार दिवस स्वॅब घेण्यावर भर-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात मनपाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात येत आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने नागरिक घरीच असल्याने तपासणीस मदत होत असल्याचे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले. या सर्वेक्षणात लॉकडाऊनचे शेवटचे चार दिवस १० ते १३ जुलै दरम्यान स्वॅब घेण्यावर भर राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले. याशिवाय कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांच्या रुग्णांनाही वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी असल्याचा मुद्दा फडणवीस यांनी मांडला होता. त्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत इतर आजारांच्या रुग्णांना उपचार मिळण्याचे प्रमाण वाढवून त्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी एका नायब तहसीलदाराची नियुक्ती करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.