जळगाव - मालेगाव येथील बंदोबस्तावरून निघून आलेले आणखी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी यापूर्वीही तीन पोलीस कर्मचाऱ्यांना या प्रकरणी निलंबित केले होते.
जळगाव जिल्ह्यातून मालेगाव येथे लॉकडाऊन दरम्यान ११० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले होते. नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी मालेगाव येथे विविध ठिकाणी या कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी ड्युटी देण्यात आली होती. यातील पाच कर्मचारी कोणालाही न सांगता जळगावला परत निघून आले होते. यातील तीन जणांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले होते. तर उर्वरीत सोनजी सुभाष कोळी व महेंद्र प्रकाश शिंपी या दोघांना बुधवारी निलंबीत करण्यात आले. पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी हे आदेश काढले.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात कायदा व सुव्यस्था राखण्याची जबाबदारी दिलेली असतानाही या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही वरीष्ठ अधिकाऱयांना पुर्वपरवानगी न देता परस्पर निघून आले. त्यांनी मालेगाव ते जळगाव असा विनापरवाना प्रवास करुन स्वतःचा आणि इतर नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकले असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.