जळगाव - भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज (दि. 30 डिसें.) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास चाळीसगाव ते धुळे महामार्गावर असलेल्या दसेगाव फाट्यावर घडली.
धान्याची पोती वाहून नेणारा आयशर ट्रकला गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरने धडक झाल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे पुढच्या बाजूचे नुकसान झाले आहे. पहाटेच्या वेळी चालकाला झोपेची डुलकी आल्याने हा अपघात घडल्याचे घटनास्थळावरील परिस्थिती पाहून लक्षात येत आहे. अपघातग्रस्त वाहने अडकून पडल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण तसेच मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
रस्त्याच्या मध्यभागी अडकून पडलेल्या दोन्ही अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करण्यासाठी क्रेन आणण्यात आले होते. मात्र, उशिरापर्यंत वाहने बाजूला करण्यात यश आलेले नव्हते. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या चालकांना रुग्णवाहिकेद्वारे चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. दोन्ही चालकांची ओळख पटलेली नव्हती.
हेही वाचा - जिल्हा परिषदेचा 'मुकुट' राखण्यासाठी भाजपत खल; महाविकास आघाडीला शह देण्याचे आव्हान