जळगाव -विवाह सोहळ्यासाठी निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला कंटनेरने धडक दिली. या अपघातात पती-पत्नीचा कंटेनरच्या मागच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 18 जाने.) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जळगाव शहराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर पोदार शाळेसमोर घडली.
महेंद्र गोपालदास आहुजा (वय 48), भावना महेंद्र आहुजा (वय 48, दोघे रा. गायत्रीनगर, जळगाव) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. आहुजा दाम्पत्य हे जळगाव शहरातील गायत्रीनगरात वास्तव्यास होते. त्यांचे फुले मार्केटमध्ये गोपालदास जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानावर नेहमी मालाची खरेदीसाठी येणाऱ्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील एका ग्राहकाकडे आज विवाह सोहळा होता. या विवाह सोहळ्यासाठी आहुजा दाम्पत्य दुचाकीने (एम.एच. 19, ए.जे.8248) जात होते. महामार्गावरील पोदार शाळेजवळ त्यांच्या दुचाकीला पाळधीकडेच जात असलेल्या कंटेरने (एम.एच. 04 जी.एफ. 0984) धडक दिली. या अपघातात दोघेही रस्त्यावर पडून कंटेरनच्या मागच्या चाकात सापडले. दोघांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा - जळगावात पूर्ववैमनस्यातून बांधकाम व्यावसायिकाला मारहाण
तीन लेकरे झाली अनाथ
आहुजा दाम्पत्याला वंशिका (वय 18 वर्षे), प्रिया (वय 12 वर्षे) व ओम (वय 8 वर्षे) अशी तीन मुले आहे. माता व पित्यावर एकाचवेळी अपघाताच्या रुपाने काळाने घातलेल्या घाल्यामुळे तीनही मुले पोरकी झाली. अपघाताची माहिती मिळताच फुले मार्केटमधील व्यापारी व आहुजा यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. महामार्ग नव्हे तर मृत्यूमार्ग असलेल्या या मार्गाने आहुजा दाम्पत्याच्या रुपात आणखी दोन बळी घेतल्याने नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा - जळगाव @ 10 अंश सेल्सिअस; कडाक्याच्या थंडीने जनजीवन प्रभावित