जळगाव - पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यातील यावल शहराजवळ, भुसावळ रस्त्यावरील हतनूर पाटचारीत घडली. दीपक जगदीश शिंपी (वय १३) व युवराज नीळकंठ दुसाने (वय १५) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. हे दोघे यावल शहरातील सुदर्शन चित्र मंदिर परिसरात असलेल्या सरस्वती विद्यामंदिर शाळेजवळ राहत होते.
मित्रांसोबत गेले होते पोहायला
दीपक व युवराज हे दोघे काल (बुधवारी) आपल्या मित्रांसोबत यावल-भुसावळ रस्त्यावरील हतनूर पाटबंधारे विभागाच्या पाटात पोहण्यासाठी गेलेले होते. सध्या या पाटचारीत शेती पिकांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाटचारी पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. पाण्यात पोहण्यासाठी उतरल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघे पाण्यात बुडाले. यावेळी त्यांच्या मित्रांनी बचावासाठी आरडाओरडा केला. पण तोपर्यंत दोघेही बुडाले होते.
शहरातील नागरिकांची घटनास्थळी धाव
हतनूर पाटचारीच्या पाण्यात दोन मुले बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर शहरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लगेचच शोधकार्य सुरू झाले. काल दुपारपासून या दोन्ही मुलांच्या मृतदेहांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, आज सकाळी दोघांचे मृतदेह सापडले. या घटनेमुळे यावल शहरातील सुदर्शन चित्रमंदिर परिसरावर एकच शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटील यांचे नाव द्या - आगरी समाज