जळगाव - तालुक्यातील देव्हारी येथे अवैधरित्या रानडुकराची शिकार करणार्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशोक खेमा चव्हाण (वय 57), मोहन खेमा वंजारी (वय 50) दोन्ही (रा. देव्हारी, ता. जळगाव) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांना जळगाव वन परिक्षेत्राच्या पथकाने रानडुकराच्या मास, शिकारीच्या साहित्यासह अटक केली आहे.
दोघांकडून 17 किलो मांस जप्त
जळगाव तालुक्यातील उमाळ्याजवळ असलेल्या देव्हारी गावातील मोहन वंजारी व अशोक चव्हाण या दोघांनी वन्यप्राणी रानडुकराची अवैधपणे शिकार केल्याची माहिती उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांना मिळाली. त्यानुसार होशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक चिमाजीराव कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर.जी.राणे यांच्यासह पथकाने देव्हारी गाव गाठले. दोघांनी रानडुकराची शिकार करुन बैलगाडीतून ते गावाजवळ असलेल्या शेतात नेले. याठिकाणी दोघेही मास भाजून त्यावर ताव मारणार होते. याच दरम्यान दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत पथकाने दोघांकडून 17 किलो मांस, कुर्हाड, विळा हे शिकारीचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी वनविभागात वन्यजीव संरक्षक अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना तीन दिवस वन कोठडी
दरम्यान, दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयितांनी मांस कुणाला विक्री केले आहे, तसेच यापूर्वी अशाप्रकारचे गुन्हे केले आहेत का, याबाबत तपास केला जात आहे.