जळगाव - कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी राज्य सरकारने मार्च महिन्यापासून कडक निर्बंध लादले आहेत. त्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय ठप्प आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. किमान आता तरी आम्हाला व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करत आज (सोमवारी) जळगाव शहरातील विविध मार्केटच्या व्यापाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली.
शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात व्यापाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. जळगाव जिल्ह्यात आता कोरोनाची दुसरी लाट काहीअंशी ओसरली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून, परिस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने नव्याने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन शहरासह जिल्ह्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करून अत्यावश्यक सेवेप्रमाणे इतर व्यापाराला देखील परवानगी देण्यात आली पाहिजे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली.
अन्यथा व्यापाऱ्यांवर आत्महत्येची वेळ -
कोरोनामुळे दीर्घकाळापासून व्यापार बंद आहे. मात्र, कर्मचाऱ्यांचे पगार, कर्जाचे हफ्ते, कर, इतर देणी व्यापाऱ्यांना सुटलेली नाहीत. आता व्यवसाय सुरू झाला नाही तर व्यापाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्याने व्यवसाय सुरू करायला परवानगी द्यावी, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. शहरातील महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, संत कंवरराम मार्केटमधील व्यापारी व त्यांचे प्रतिनिधी शिष्टमंडळात होते.
सकारात्मक निर्णय घेऊ, पालकमंत्र्यांचे आश्वासन -
व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सविस्तर चर्चा केली. आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असून, पॉझिटिव्हिटी देखील कमी आहे. त्यामुळे राज्य सरकार जी मार्गदर्शक तत्वे जाहीर करेल, त्यानुसार व्यापाऱ्यांना निश्चित दिलासा देण्यात येईल. या विषयासंबंधी जिल्हाधिकारी व व्यापारी प्रतिनिधी यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिले.