जळगाव - प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पद्मालय येथून नवस फेडून घरी परतणाऱ्या भाविकांचे ट्रॅक्टर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ३० जण जखमी झाले. हा अपघात आज सायंकाळी पद्मालय-एरंडोल रस्त्यावर घडला. अपघातात जखमी झालेल्या १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
एरंडोल तालुक्यातील सोनबर्डी येथील काही भाविक श्रावणी सोमवार असल्याने नवस फेडण्यासाठी पद्मालय येथे गेले होते. नवस फेडल्यानंतर घरी परतताना या भाविकांच्या ट्रॅक्टर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाची पद्मालय-एरंडोल रस्त्यावर एरंडोलजवळ समोरासमोर धडक झाली. त्यानंतर ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उलटले. या अपघातात ट्रॅक्टर आणि रिक्षातील तब्बल ३० जण जखमी झाले. जखमींपैकी १० जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये लहान मुले, महिला तसेच तरुणांची संख्या अधिक आहे. या अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहन चालकांनी वाहने थांबवून मदतकार्याला सुरुवात केली. काहींनी भ्रमणध्वनीवरून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका एरंडोल येथून घटनास्थळी बोलावली. जखमींना त्वरित एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच अपघातातील गंभीर जखमींना जळगाव येथे हलविण्यात आले.
रिक्षाचे मोठे नुकसान -
या अपघातात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात ट्रॅक्टरदेखील उलटल्याने ट्रॅक्टरमधील भांडी व इतर साहित्य रस्त्यावर पडले होते. जखमी झालेल्या लोकांच्या मदतीसाठी एरंडोल शहराच्या आजूबाजूला असलेल्या गावातील लोकांनीही धाव घेतली होती.