जळगाव - जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात तब्बल 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 190 वर पोहचली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या द्विशतकाच्या उंबरठ्यावर पोहचली असून आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. जळगाव शहरासह भुसावळ, पाचोरा आणि अमळनेरात सातत्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, पाचोरा, भुसावळ येथील स्वॅब घेतलेल्या 39 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आज रात्री प्राप्त झाले आहेत. यापैकी 32 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 7 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये पाचोरा एक, जळगाव दोन तर भुसावळच्या 4 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये पाचोरा येथील 21 वर्षीय तरुणाचा, जळगाव शहरातील शांतीनगर येथील 51 वर्षीय व श्रीराम नगरातील 63 वर्षीय पुरुषाचा तर भुसावळ येथील 58, 60, 70 वर्षीय पुरुषांचा तर 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच अमळनेर येथील यापूर्वीच कोरोना बाधित आढळून आलेल्या एका 58 वर्षीय पुरुषाचा 14 दिवसानंतरचा तपासणी अहवालही पाॅझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 190 इतकी झाली असून, त्यापैकी 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 29 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.